मानोरा – डिसेंबर २०१४

10885016_964178193609510_2076113074766363954_n

मानोरा, जि. वाशिम

डिसेंबर २०१४ मधली विदर्भातली हाडमोडी थंडी, पारा ७-८ डिग्रीच्या आसपास आणि सकाळी ८ वाजेपासून
मानोऱ्यातल्या रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळेत ९वी, १०वीची मुलं जमायला सुरुवात झाली होती. शाळेची वेळ ११ची.
पण ८ वाजता सुरु होणाऱ्या पूरक शिक्षण वर्गासाठी ही मुलं तब्बल ३ तास आधी शाळेत दाखल झालेली.

एक एक मुलगा, मुलगी धावत-पळत पोहोचत, ‘मे आय कम इन सर?’ म्हणत वर्गात येत होती. २ वर्गांत बसलेल्या
एकूण ५४ मुलांपैकी १०-१५ सोडली, तर बाकी सगळी मुलं ३,४,५ किमी चालत येणारी. काही जणांकडे काही सरकारी
योजना किंवा डोनेशन मध्ये मिळालेल्या सायकली. स्वेटरची, लोकरीच्या कपड्यांची गरज प्रचंड; पण परवडत नाहीत ते
सगळ्यांना. मग एखादा जीर्ण अर्ध्या हातांचा स्वेटर, किंवा मुलींना एखादा स्कार्फ; पण याचा उपयोग केवळ दिलासा
मिळण्यापुरता. बऱ्याच मुला-मुलींना तेही नाही, नुसता शाळेचा गणवेश.

गोठलेली बोटं आणि हात एकमेकांवर चोळत वर्गात येऊन बसायचं निष्ठुर लोखंडी बाकांवर, आणि पुढचे २-२.५ तास
गणित आणि इंग्रजीचा अभ्यास. पण इथून एक वेगळी गोष्ट सुरु होते. हे २-२.५ तास मनमोकळी चर्चा होते, हवे तेवढे
आणि हवे ते प्रश्न, त्यांवर उत्तरं शोधण्याचा प्रवास, रोज नवीन काहीतरी मिळाल्याचा आनंद, त्यातून वाढत जाणारी
अभ्यासाची आणि शिकण्याची आवड, पार केलेल्या एक-एक अडथळ्याच्या विटा एकावर एक रचत पुढची पायरी
बांधायची आणि तिथे पोहोचायची लागलेली सवय, आणि या सगळ्यातून डोळ्यांत आकारबद्ध होत जाणारी स्वप्नं.

पण गोष्ट इथेही थांबत नाही. या मुलांसोबत हे सगळं घडवून आणणारे उत्साही आणि निश्चयी कार्यकर्ते अजून पुढचे
प्रश्न ठेवतात मुलांसमोर. स्वप्नं नुसती पाहून पूर्ण होत नाहीत. ती रुजवावी लागतात स्वत:त. नकारात्मक आणि
आव्हानात्मक लोक आणि परिस्थितीशी दोन हात करत जपावं लागतं वेड, त्या स्वप्नांच्या पूर्तीचं. १४-१५ वर्षे वयाची
ही मुलं आयुष्याच्या गणिताला हात घालतात दररोज; आणि पर्याय तरी कुठे आहे त्यांच्यासमोर? त्यांनी हे केलं नाही
तर या गणिताचे महान रचयिते, हा (म्हणवला जाणारा) समाज, शिक्षणाची आणि त्यावर आधारित संधी आणि
प्रगतीची (अ)व्यवस्था – हे सगळे त्यांना नापास घोषित करून माणूस म्हणूनही निव्वळ निरुपयोगी ठरवण्यात अजिबात
हयगय करणार नाहीत.

पण हे होणे नाही. ही मुलं हे होऊ देणार नाहीत, आणि त्यांना शाळेत पुन्हा दाखल करून, टिकवून स्वत:च्या पायावर
उभं करण्याच्या प्रक्रियेत पाय घट्ट रोवून उभी राहिलेली लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसुद्धा हे होऊ देणार नाही.
मानोरा हे फक्त एक केंद्र आहे. महाराष्ट्रात रायगड, जालना, वाशिम आणि नंदुरबार मध्ये एकूण २४ केंद्रांवर १५००
मुलांसोबत हे कार्य अविरत सुरु आहे.

चारच दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठ सहकार्यांसोबत दिलेल्या भेटीत, चर्चेनंतर पुन्हा शाळेच्या बाहेर मुलांसोबत गप्पा सुरु
झाल्या. ८वीत ज्यांना आम्ही ए,बी,सी,डी पासून शिकवायला सुरुवात केली होती, त्यांच्यातलीच अंकिता म्हणाली,
“you know sir, we are very happy that we are in Light
of Life Trust. आता आम्हांला भीती नाही वाटत कसली. आम्ही ठरवलं तर खूप काही करू शकतो हे
कळलंय आता.”
निघायची वेळ होऊन गेली तरी कोणाचाच पाय निघत नव्हता. त्यांनाही खूप बोलायचं होतं अन मलाही. शेवटी
सगळ्याजणी म्हणाल्या, “सर, तुम्ही आज एवढं छान बोललात सगळे जण. आम्हांला खूप प्रेरणा मिळते तुम्ही भेटलात
की…!”
मी तेव्हाही म्हणालो, आणि आता आणी सतत मला जाणवत राहतं, “बाळांनो, तुमच्यापेक्षाही जास्त आम्ही प्रेरणा घेतो
तुमच्याचकडून. तुम्ही एवढी धडपड करून शिकताय, स्वप्नं पाहताय, मग आम्ही एवढंही नको का करायला…?”

– मकरंद

तो…

तो लिहायचा
त्याला बरं वाटायचं..
मग
थोडं काहीतरी
अमुक-तमुक
तुटक-मुटक
इकडचं-तिकडचं
किडूक-मिडूक
असं काही लिहित असताना
त्याला लक्षात आलं
फारच गोड गोड लिहीतोय तो..
पेन बदलायला हवं, तो म्हणाला स्वत:शी..
मग
नव्या पेनाने विषारी-विखारी लिहून पाहिलं,
गावरान-शिवराळ लिहून पाहिलं
आणि त्याला बरं वाटलं..
मग लिहावं असं काही सापडेनासं झालं
आणि त्याला वाटलं पुन्हा पेन बदलायला हवंय..
मग
बदललं पेन…
तरीही काही नाही..
मग म्हणाला साला आटलोय मीच
बंद करावं लिहिणं
आणि तो जगायला लागला….!
आता त्याला सांगायचंय मला,
लिही बाबा पुन्हा..
तुझं पेन बदलायची गरज नव्हती कधीच
आता तुझ्या बोटाचीच लेखणी आहे सशक्त
आणि नसां-नसांतून शाई वाह्त्येय अस्सल..
आता लिहायला हवं आहेस तू..!!
– मकरंद

via Facebook.